जेएनएन, जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळाला राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळाला आहे. येत्या काही महिन्यांत येथे मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबवली जाणार आहेत. सुमारे 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, ही कामे वर्षभरात पूर्ण केली जाणार आहेत.

केंद्र सरकारकडून तांत्रिक आणि आर्थिक मदत

जळगाव शहरातील विमानतळाची सेवा अधिक गतीमान करण्यासाठी केंद्र सरकारकडून तांत्रिक व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार, केंद्राने जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे.

सध्या जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तसेच हवाई प्रशिक्षण केंद्र येथे चालवले जात आहे. मात्र, सध्या विमानतळाचे कामकाज केवळ एका पाळीतच चालत आहे, त्यामुळे प्रवाशांना काही अडचणींना सामोरे जावे लागते.

या विमानतळावर भौतिक सोयी–सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना गॅरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्याकडे पत्र पाठवून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य तातडीने देण्याची मागणी केली आहे. 

असा होणार विकास

    • विमानतळाचे धावपट्टी विस्तारीकरण आणि मजबुतीकरण
    • नवीन टर्मिनल इमारत व आधुनिक प्रतीक्षागृहांची उभारणी
    • पार्किंग व सुरक्षा व्यवस्थेचा विस्तार
    • रात्रीच्या उड्डाणासाठी आवश्यक लाइटिंग सिस्टम बसविणे
    • हवाई प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन उपकरणांची खरेदी

    हेही वाचा - लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, ऑक्टोबरचा हप्ता ₹1500 या दिवशी होणार जमा? 410.30 कोटींचा निधी मंजूर