जेएनएन, मुंबई. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान याद्यांमधील विसंगतीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तापला आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या यादीत अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि अधिकारी यांची दुबार नोंदणी झाल्याचे उघड होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठे नाव चर्चेत आले आहे. तत्कालीन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचे दुबार नाव मतदार यादीत आल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार, राजेश नार्वेकर यांचे नाव दोन ठिकाणी, नवी मुंबई आणि ठाणे शहरात मतदार म्हणून नोंदवले गेले आहे. म्हणजेच त्यांची दुबार नोंदणी झाली असून, हा प्रकार निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.
दुबार नोंदीवर राजकारण तापलं!
राज्यात मतदान यादीवरून आधीच आरोप-प्रत्यारोपांचा सुरू आहे. अनेक पक्षांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्या तयार करताना निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव अशा प्रकारे दुबार नोंदले गेल्याने या नवीन वादाला तोंड फुटले आहे.
असे आहे प्रकरण
माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईतील त्यांच्या राहत्या पत्त्यावर मतदार म्हणून नोंदणी केली होती. परंतु, त्याचबरोबर त्यांचे नाव ठाणे शहरातील एका मतदारसंघात देखील मतदार म्हणून नोंदले गेले आहे. म्हणजेच, एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नाव आहे, जे निवडणूक नियमांनुसार गैरप्रकार मानला जातो.
