जेएनएन, अहिल्यानगर: नेवासा तालुक्यातील वडुले गावातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी प्रचंड कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःची व्यथा सांगत राज्य सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. हा व्हिडीओ काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडिओमध्ये सरोदे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून कर्जबाजारीपणामुळे ते त्रस्त होते. पिकाला भाव नाही, शेतीला उत्पादन खर्च निघत नाही आणि मागील कर्जाचा भार वाढत चालला होता. नव्या कर्जासाठी वित्तसंस्थांकडून होणारा तगादा सहन होत नव्हता. अखेर हताश होऊन त्यांनी विष प्राशन करून जीवन संपवले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानात दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी नाही, असा उल्लेख केला होता. या विधानामुळे शेतकरी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आत्महत्या केलेल्या सरोदे यांच्या व्हिडिओमध्येही त्यांनी सरकारकडून फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे.
या घटनेनंतर वडुले परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी संघटनांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली असून तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे तर पुढील तपास सुरू आहे.