जेएनएन, नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे.आज नाशिक शहरातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीत अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे पक्षातील असंतोष आता उफाळून आला आहे.
तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आज भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला”, “बाहेरच्यांना प्राधान्य दिले जात आहे” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण झाले होते. शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी तातडीने भाजप कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कार्यालयाबाहेर तसेच परिसरातील प्रमुख मार्गांवरही पोलीस नजर ठेवून आहेत.
दरम्यान, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, तिकीट वाटपावरून निर्माण झालेला हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे असून, येत्या काळात भाजप नेतृत्व ही नाराजी कशी शांत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: BMC Election 2026: मुंबईत मनसेचा गुजराती उमेदवार, माटुंग्यातून हेमाली बन्सालींना उमेदवारी
हेही वाचा: BMC Election 2026: मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा मुहूर्त ठरला, 3 जानेवारीला पहिली जाहीर सभा
