जेएनएन, मुंबई: मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती असा वाद राजकीय चर्चेचा विषय ठरत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक वेगळा आणि लक्षवेधी निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट गुजराती समाजातील हेमाली बन्साली यांना माटुंगा प्रभागातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मनसेच्या या निर्णयाकडे अनेकजण राज ठाकरेंची समावेशक राजकीय भूमिका म्हणून पाहत आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा ठामपणे मांडणाऱ्या मनसेकडून गुजराती उमेदवार देण्यात आल्याने, पक्षाची “मुंबई सर्वांची” ही भूमिका अधोरेखित होत असल्याचं बोललं जात आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना हेमाली बन्साली यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
“मराठी–गुजराती असा वाद करण्यात काहीही अर्थ नाही. मुंबईत सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतो. विकास आणि नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.” माटुंगा परिसरात मराठी आणि गुजराती समाजाची मोठी वस्ती असून, येथील स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न यावर लक्ष केंद्रित करून निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मनसेच्या या निर्णयामुळे मुंबईतील निवडणुकीत जात–भाषेपेक्षा विकास आणि स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं मत पक्षाने मांडले आहे. एकीकडे भाषिक वादांवरून वातावरण तापलेलं असताना, मनसेचा हा निर्णय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात या उमेदवारीचा माटुंगा आणि आसपासच्या प्रभागांतील मतदारांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा: BMC Election 2026: मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा मुहूर्त ठरला, 3 जानेवारीला पहिली जाहीर सभा
