मुंबई. Ashok Kharat Molestation News: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या कारनाम्याने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या भोंदूने महिलांना अनेक आश्वासने देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. डोक्यावर तांब्याचे भांडे धरून महिलांशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली. या प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब एसआयटीच्या चौकशीत समोर आली आहे. नाशकात सुरू असलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नाशिकमध्ये अजून काही पीडितांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत असून आरोपीच्या कुकर्माचा पेटारा उघडला जात आहे. काल पोलिसांना 58 व्हिडिओ मिळाले होते, मात्र महिलांच्या लैंगिक शोषणाचे इतकेच व्हिडिओ नसून त्याचा आकडा 100 हून अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्हिडिओंमध्ये ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर येत आहे. यामुळे अमेरिकेतील एपस्टीन फाइल्स प्रकरण ताजे झाले आहे.

लॅपटॉप व पिस्तुलही सापडले -

आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहे. खरात प्रकरणात सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुमारे दीड तास आढावा बैठक घेतली. या SIT मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे 100 हुन अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

    कॅप्टन खरातविरुद्ध दाखल तीन गुन्ह्यांचा तपास -

    सध्या कॅप्टन खरातविरुद्ध दाखल तीन गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा, वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा, तर शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान खरातने अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध निर्माण करून मोठी संपत्ती उभी केल्याचेही समोर आले आहे. नाशिकमध्ये आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, तसेच पाथर्डी परिसरातील सुमारे 30 एकर जमीन आणि इतर ठिकाणी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

    कोण आहे अशोक खरात? 

    नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा नौदलातून सेवानिवृत्त झाल्याचे सांगतो. तो ज्योतिष आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. 'शिवनिका ट्रस्ट'चा अध्यक्ष आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरातच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यातील मोठे नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर.