नाशिक - अशोक खरात स्वतःला निवृत्त नौदल कॅप्टन संबोधत होता. तो लोकांमध्ये स्वतःला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आणि अंक ज्योतिष शास्त्रज्ञ म्हणूनही मिरवत असे. आता त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, त्यांतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
स्वतःला भविष्यवेक्ता म्हणवणाऱ्या अशोक खरात याला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याने एका 35 वर्षीय महिलेला अमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने धार्मिक विधींचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात अडकवले. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो धार्मिक विधीच्या नावाखाली एका महिलेच्या डोक्यावर तांब्याचे भांडे ठेवून तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे.
अशोक खरातकडे 58 व्हिडिओ सापडले
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अशोक खरातच्या अटकेनंतर त्याच्याकडून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ वेगवेगळ्या महिलांचे आहेत. हे व्हिडिओ आता या प्रकरणातील पुराव्याचा भाग आहेत. खरातची अटक आणि या स्वयंघोषित भोंदू बाबाचे महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने, विरोधी पक्षांना सत्ताधारी आघाडीवर हल्ला करण्यासाठी आयचे कोलित मिळाले आहे.
या संपूर्ण प्रकरणात, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एक मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसरही चर्चेत आहे. असाही आरोप केला जात आहे की, अशोक खरात 2010 मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराच्या ट्रस्टशी संबंधित असून मंदिराच्या जवळ त्यांचे एक आलिशान फार्महाऊस देखील आहे. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि व्हीआयपी नेहमी भेट देत असत.
एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरात यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये चाकणकर खरात यांचे पाय धुताना आणि आदर व्यक्त करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या त्यांना आपले गुरू म्हणून संबोधत आहेत. रूपाली चाकणकर या शिवनिका नावाच्या ट्रस्टच्या सदस्यसुद्धा आहेत, जिथे अशोक खरात अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
लग्न वाचवण्यासाठी आली पण संसार उद्ध्वस्त झाला-
नाशिक पोलीस गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आमिष दाखवून एका 27 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातविरुद्ध मंगळवारी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, वैवाहिक समस्यांमुळे तिने अशोक खरातकडे सल्ला मागितला होता, त्यानंतर ती त्याच्या संपर्कात आली. त्याने तिला आमिष दाखवून, तिच्या सर्व समस्या हळूहळू सुटतील असे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. याच बहाण्याने त्याने 2022 ते 2025 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.
आरोपीच्या मालमत्तेची चौकशी
अशोक खरात स्वतःला निवृत्त नौदल कॅप्टन म्हणवत असे. . तो लोकांमध्ये स्वतःला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्री म्हणूनही मिरवत असे. असे म्हटले जाते की अनेक राजकारणी, व्यावसायिक आणि कलाकार त्याच्याकडे सल्ल्यासाठी येत असत. पोलीस आता आरोपीच्या मालमत्तेचीही चौकशी करत आहेत, जी वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेली असून तिचे मूल्य कोट्यवधी रुपये असल्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या कलमान्वये अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल
अशोक खरात यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 64 (बलात्कार) आणि 69 (फसवणूक किंवा खोट्या आश्वासनाद्वारे लैंगिक संबंध) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, दुष्ट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, 2013 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
