मुंबई. Nashik Ashok Kharat case: नाशिकचा भोंदू अशोक खरात  जो स्वत:ला निवृत्ता नौदल कॅप्टन संबोधत होता त्याच्या कारनाम्याने समाजमन सुन्न झाले आहे. कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलांच्या असहायत्तेचा फायदा घेऊन त्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले आहेत.

चाकणकरांनी खरातची पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता याप्रकरणावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांची फेसबूक पोस्ट राज्यात एकच चर्चेचा विषय ठरली आहे. 

अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद यापूर्वीही समोर आले होते. आता भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर मोठा हल्ला चढवला आहे. चाकणकरांचे या भोंदूसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ‘राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार … बजाव टाली’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

खरातचे अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी लागेबांदे -

स्वयंघोषित धर्मगुरू अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जात आहे. त्याचे फोन कॉल व त्याच्याकडे सापडलेल्या व्हिडिओंची तपासणी केली जात आहे. त्याचे आर्थिक व्यवहार, नेटवर्क, सहकारी आरोपींचा शोध घेतला जात असतानाच त्याचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर त्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक गावातील जमिनी लाटल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.