मुंबई. Rupali Chakankar : अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली, सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली.. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि वादग्रस्त धर्मगुरू अशोक खरात यांचे अनेक फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत कवितेच्या माध्यमातून चाकणकरांवर बोचरी टीका केली आहे.
वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांचे अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध व त्याचे व्हिडिओ समोर आल्याने तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अनेक फोटो व व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक खरात यांच्या पाया पडतानाचे, त्याचे पाय धुतानाचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली ठोंबरे, अंजली दमानिया आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाने जोरदार टीका केली आहे. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कवितेच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे?
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणे हा स्त्रीशक्तीचा अपमान आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे कविता -
महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला
जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!
त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली
सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.
काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली
न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली
सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली,
गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली….
अशोक खरात प्रकरण काय आहे?
नाशिकच्या अशोक खरात नावाच्या व्यक्तीचे गेल्या काही दिवसांपासून काही व्हिडीओ समोर आले होते. ज्यामध्ये ते स्वतःला दैवी शक्ती असलेले गुरु मानत असल्याचे दिसून येते. खरातकडे ५८ व्हिडिओ आढळले असून त्यात तो वेगवेगळ्या महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहे. याच खरात यांच्या पाया पडताना आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेताना रुपाली चाकणकर यांचे काही जुने-नवे फोटो समोर आले. यावरून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
