मुंबई. Arun Gawli released from Jail : गुंडगिरीतून राजकारणी बनलेला अरुण गवळी १७ वर्षांनी तुरुंगातून सुटला आहे. अरुण गवळी 2007 मधील एका खून प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होता. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला, त्यानंतर तो आज तुरुंगातून बाहेर आला आहे.
76 वर्षीय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीवर शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गवळी गेल्या 17 वर्षांपासून तुरुंगात होता आणि त्याची अपील न्यायालयात प्रलंबित आहे.
कुटुंब आणि समर्थकांकडून स्वागत-
नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, दुपारी 12:30 वाजता गवळीला तुरुंगातून सोडण्यात आले. गवळीच्या कुटुंबासह अनेक समर्थकांनी त्याचे भव्य स्वागत केले.
सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर -
अरुण गवळीला ट्रायल कोर्ट आणि मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 9 डिसेंबर 2019 रोजी गवळीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, ज्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गवळीला जामीन मंजूर केला.
2012 मध्ये झाली होती शिक्षा -
अरुण गवळी हे 2004 ते 2009 पर्यंत महाराष्ट्रातील चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2012 मध्ये महाराष्ट्राच्या ट्रायल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि १७ लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. गवळी मागील 17 वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून जामिनासाठी प्रयत्न करत होता. जामसांडेकर यांची 2007 मध्ये घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 17 वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.