जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana Shiv Bhojan thali : गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी योजना’ अडचणीत सापडली आहे. लाडकी बहीण योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन थाळीचे अनुदान थकवले जात आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या योजनेअंतर्गत शिवभोजन थाळी केंद्रांना दिले जाणारे सरकारी अनुदान गेल्या चार महिन्यांपासून थकवले गेले आहे. यामुळे अनेक केंद्रचालक अडचणीत आले आहेत.

अनुदान थकल्याने थाळीवर संकट -

‘शिवभोजन’ केंद्रांवर गरीब, कामगार, विद्यार्थी, मजूर यांना १० ते १५ रुपयांत पूर्ण थाळी उपलब्ध करून दिली जाते. मात्र, केंद्र चालविण्यासाठी लागणारा खर्च हा प्रत्यक्षात दिल्या जाणाऱ्या थाळीच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे केंद्रचालकांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.

अनुदानच चार महिन्यांपासून मिळालेले नसल्याने केंद्रचालकांकडे साहित्य खरेदी, भाडे, कामगारांचे पगार देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रचालकांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केला आहे. अनुदानच मिळणार नसेल तर ही केंद्रे चालवायची कशी? दररोज शेकडो लोकांना थाळी द्यायची, पण खर्च भरून काढायचा कुठून? असे सवाल राज्य सरकारला विचारले जात आहेत.

योजना बंद होण्याच्या मार्गावर!

सध्या राज्यभरात असंख्य शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, अनुदानाचा प्रश्न निकाली निघाला नाही तर अनेक केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही योजना बंद झाली तर स्वस्त दरात पोटभर जेवण मिळविणाऱ्या गोरगरिबांना मोठा धक्का बसणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात शिवभोजन थाळी हा अनेक कुटुंबांचा आधार ठरला आहे. या योजनेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामान्य जनतेकडूनही केली जात आहे.