नागपूर. Cyclone Montha :  चक्रीवादळ 'मोंथा' च्या प्रभावाखाली, विदर्भात 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने सोमवारी सांगितले. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे काही ठिकाणी 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुसळधार पाऊस आणि विजांसह वादळ, सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, धाराशीव व अन्य जिल्ह्यात ढगाळ हवामान व मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत ढगाळ हवामानासोबत हलका ते मध्यम पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार म्हणाले की, पश्चिम मध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या भागात 'मोंथा' हे चक्रीवादळ उत्तर-वायव्येकडे सरकले आहे.

28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते उत्तर-वायव्येकडे सरकण्याची आणि तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. वायव्य-वायव्येकडे पुढे सरकत राहिल्याने, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी/रात्री काकीनाडाभोवती मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 90-100 किमी प्रतितास ते 110 किमी प्रतितास या वेगाने वारे वाहू शकतील, असे ते म्हणाले.