जेएनएन, मुंबई. Cyclone Montha Alert: राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ सक्रिय झाले आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टा तयार होत आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
मोंथा चक्रीवादळ 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनारपट्टीला आदळण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची शक्यता आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि ग्रामीण भागात शेतीसंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
आज या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
