जेएनएन, नागपूर. NMC Budget: नागपूर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 5438.61कोटींचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. नागपूर महापालिकेच्या या अर्थसंकल्पात वर्षअखेरीस 39.56 कोटी रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली आहे. यावर्षी नागपूर महापालिकेचा एकूण खर्च 5399.05 कोटी रुपये अपेक्षित आहे. महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सुधारित व 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला.
हा अर्थसंकल्प सादर करताना महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या विकास कामाची व सध्या सुरू असलेल्या कामांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. शहरातील रस्ते, पथदिवे, शिक्षण, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनिःसारण इत्यादी नागरी सुविधा शहरांच्या सर्व भागात योग्य प्रमाणात उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे देशात प्रथमच डबल डेकर पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यात आली आहे. मनपाचे धरमपेठ, नेहरुनगर, हुडकेश्वर, नरसाळा तसेच मंगळवारी झोन टैंकर मुक्त झाले असून यापुढे शहराला टँकर मुक्त केले जाणार आहे. या नागरी सुविधांचा नागरिकांना जास्तीतजास्त लाभ होईल, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
महापालिकेचा स्वनिधी 3572.20 कोटी रुपयांचा
सन 2025-26 या वर्षातील अर्थसंकल्पात महापालिकेचा स्वनिधी 3572.20 कोटी रुपयांचा राहणार आहे. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वाटा 1167.54 कोटी इतका आहे. नव्या आर्थिक वर्षात महापालिकेचा महसुली खर्च 2364.14 एवढा राहणार असून भांडवली खर्च 2872.33 कोटी रुपये एवढा राहणार आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्त्रोतापासून उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. शासनाकडून येणारे वस्तु व सेवाकर (जीएसटी) अनुदान म्हणून नागपूर महापालिकेला 1772 कोटी रुपये अपेक्षित आहे. तसेच मुद्रांक शुल्कापोटी ७० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला होणार आहे.
शहराचा होणार कायापालट
या अर्थसंकल्पात डॉ. चौधरी यांनी नवीन योजना सादर करून नागपूर शहराची गणना एका स्वच्छ शहरामध्ये करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये क्लिन स्ट्रीट फूड योजना, दीड लाख वृक्षारोपण,.अमृत योजने अंतर्गत अनधिकृत लेआऊटचा विकास करणे, ईलेक्ट्रीक वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन, उपचारासाठी टेलिमेडीसीन उपक्रम, शाळांमध्ये 80 टक्के उपस्थित राहणार्या मुलींना उपस्थिती भत्ता, जलपर्णींचा उपयोग करून स्वयंसहायता गटाकडून उत्पादने तयार करणे, महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार, डबल डेकर पाण्याची टाकीसह टँकर मुक्त शहर होणार आहे. तसेच अग्निशमन दलाचे आमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर शहराच्या विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मध्यवर्ती असलेल्या नागपूरच्या भविष्याचा वेध घेऊन शहराची आदर्श, सुंदर व हरीत नागपूर जे की सर्व समावेशक व उद्मशील बनविण्यासाठी पारदर्शी आणि गतीमान प्रशासन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी
- मालमत्ता करात वाढ करण्यासाठी स्पीड पोस्टद्वारे तसेच व्हाट्सअपच्या सहाय्याने मालमत्ताधारकांना बिले पाठविण्यात येईल.
- ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र घेणार्यांना मालमत्ता करामध्ये सवलत देण्यात येईल.
- धरमपेठ, नेहरूनगर, हुडकेश्वर, नरसाळा, मंगळवारी झोन टँकरमुक्त करण्यात आले.
- नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी मनपा 304.41 कोटी खर्च करणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेवर एकूण खर्च 1926.99 कोटी रुपये होणार आहे.
- नगररचना विभागाचे पुढील वर्षाचे उत्पन्न 500 कोटी रुपये राहण्याची अपेक्षा.
- या आर्थिक वर्षात शहरात सिमेंट क्रांकीटचे 23.45 किलोमीटरचे रस्ते महापालिका बांधणार आहे.
- नाले व नदी संरक्षणासाठी 163 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- हॉट मिक्स प्लांटमध्ये सुधारणा करून नवा हॉट मिक्स प्लांट एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे.
- पैसे द्या व वापरा या तत्वावर सार्वजनिक ठिकाणी शौचालये निर्माण करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत एकूण ६ टप्प्यांमध्ये १६ कोटी ५० लाख रुपये खर्च होणार आहे.
- अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी घरकुल रमाई योजनेअंतर्गत 1500 नवे घरे बांधली जाणार आहे.
- नागपूर महपालिकेद्वारे आकाशचिन्ह विभागातर्फे होर्डींगवर क्यूआर कोड लावण्यात येणार असून यामुळे अनधिकृत फलक ओळखता येणार आहे.
हेही वाचा:Nagpur Violence: 17 आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, कोर्ट म्हणाले… आरोपींवरील…
हेही वाचा:Maharashtra Budget Session 2025: राज्यात गुजरात मार्गे येतो गुटखा, विजय वडेट्टीवार विधानसभेत कडाडले
हेही वाचा:Maharashtra Legislative Council Election: विधानपरिषदेची निवडणूक झाली बिनविरोध, महायुतीच्या 5 उमेदवारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ