जेएनएन, मुंबई. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी 6 उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे महायुतीचे 5 उमेदवार निवडणूक न होताच विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. यानंतर आज या पाचही नवनिर्वाचित आमदारांनी विधान परिषदेत शपथ घेतली.  विरोधकांकडून कोणताही अर्ज आलेला नव्हता. 

या जागा झाल्या होत्या रिक्त

विधानपरिषदेतील शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या आहेत. त्यामुळे या रिक्त जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

यांनी घेतली शपथ

त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून 5 जणांची नावे जाहीर केली होती. यामध्ये भापजकडून संदीप जोशी (नागपूर), संजय केनेकर (छत्रपती संभाजीनगर), दादाराव केचे (वर्धा), यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, अजित पवार गटाकडून संजय खोडके  (अमरावती) यांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार) यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज त्यांची बिनविरोध विधानसभेवर निवड झाली आहे.

    मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

    चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदिप जोशी यांचे विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं.

    हेही वाचा - Nagpur Violence: 17 आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, कोर्ट म्हणाले… आरोपींवरील…

    विधानपरिषदेची सदस्य संख्या

    महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून 7 आमदार, पदवीधरांमधून 7 आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार  आणि सामाजिक सेवा यातून 12 आमदारांची नियुक्ती करतात.