चंद्रपूर (एजन्सी). महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे एका शेतकऱ्याने दावा केला आहे की त्याला चार सावकारांनी कर्ज परतफेडीसाठी तगादा लावण्यात आला होता. त्यामुळे त्याने स्वत:ची किडनी विकून त्यांचे पैसे परत केले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चार आरोपींना अटक केली आहे.
1 लाखाचे कर्ज पोहोचले 74 लाखांवर -
सावकारांनी 1 लाख रुपयांवर 10 हजार रुपये प्रतिमहिना दराने व्याज वसुली सुरू केली. रोशनने आपली 2 एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकला, घरातील सर्व किमती सामान विकले मात्र तरीही कर्ज कमी झाले नाही. 1 लाख रुपयांचे कर्ज व्याजासहीत 74 लाखांवर पोहोचले.
पोलिसांनी सांगितले की, ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात चार सावकारांविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रहिवासी रोशन सदाशिव कुडे (वय 29) या संकटग्रस्त शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली की त्याने 2021 मध्ये चार स्थानिक सावकारांकडून 40 टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
त्या शेतकऱ्याकडे चार एकर जमीन आहे. शेतीत झालेल्या नुकसानीमुळे, कुडे यांनी पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुग्धव्यवसायातून काही उत्पन्न मिळवण्याच्या आशेने त्याने गायी खरेदी केल्या आणि त्यासाठी 2021 मध्ये परिसरातील सावकारांकडून काही कर्ज घेतले.
कोलकात्यात तपासणी व कंबोडियात शस्त्रक्रिया -
एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडेला कोलकाता येथे नेले आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर, कुडे यांची कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांची किडनी काढून घेण्यात आली. शेतकऱ्याच्या दाव्यानुसार, त्याला त्या बदल्यात 8 लाख रुपये मिळाले. यानंतर, नागभीड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कुडे यांच्याशी संपर्क साधला आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलिसांनी सांगितले की, कुडे यांच्याकडून कोलकाता येथील डॉक्टरांची माहिती आणि त्यांची वैद्यकीय तपासणी झालेल्या ठिकाणासह सर्व माहिती घेतली जाईल. आम्ही त्याचे आर्थिक व्यवहार तपासले आणि आम्हाला आढळले की त्याने काही सावकारांकडून काही रक्कम उधार घेतली होती. याप्रकरणी आम्ही चार जणांना चौकशीसाठी अटक केली आहे, असे चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्माका म्हणाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
