जेएनएन, गडचिरोली: महाराष्ट्राच्या गडचिरोली पोलिसांना माओवाद विरोधातील लढाईला आजवरचे सर्वात मोठे ऐतिहासिक यश मिळाले आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वातील प्रमुख सदस्य, पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर असलेला मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने तब्बल 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याची अट नक्षलवाद्यांनी टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरचा दौरा सोडून तडका फडकी गडचिरोली येथे दाखल झाले. आणि त्यांच्यासमोर त्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे.
सामूहिक आत्मसमर्पणाची घटना!
माहितीनुसार, ही सामूहिक शरणागती काल रात्री उशिरा दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने झाली.आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये भूपतीसह अनेक महत्त्वाचे कमांडर आणि सदस्य सामील आहेत. यामध्ये 54 हून अधिक शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत, ज्यात AK-47 आणि INSAS सारख्या रायफल्सचा समावेश आहे. गडचिरोलीच्या नक्षलवाद विरोधी इतिहासातील सर्वात मोठी शरणागती मानली जात आहे.
कोण आहे 'भूपती'!
69 वर्षीय मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ भूपती हा सीपीआय (माओवादी) संघटनेचा एक अत्यंत प्रभावशाली आणि ज्येष्ठ नेता आहे. तो सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि पॉलिट ब्युरो मेंबर तसेच संघटनेचा प्रवक्ताही होता. भूपतीवर महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांकडून एकूण 6 कोटींहून अधिक बक्षीस जाहीर होते.
माओवादी चळवळीत 40 वर्षांहून अधिक काळ सक्रिय असलेला भूपती हा संघटनेचा 'रणनीतीकार' आणि 'वैचारिक प्रमुख' मानला जात होता.
2011 मधील चिंतालनार हत्याकांडात ज्यात 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. जानेवारी 2025 मध्ये त्याची पत्नी तारक्का (ती स्वतः नक्षल कमांडर होती) हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. पत्नीच्या आत्मसमर्पणानंतर भूपतीवर आत्मसमर्पण करण्यासाठी प्रचंड दबाव होता.
शरणागतीने नक्षलवादला झटका!
नक्षलवादाच्या केंद्रस्थानी असलेल्या गडचिरोलीतून एवढ्या मोठ्या नेत्याने इतक्या सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
भूपतीने काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारला सशस्त्र संघर्षाचा मार्ग सोडून शांतता चर्चेचे आवाहन केले होते, ज्यामुळे संघटनेत मतभेद असल्याचे उघड झाले होते. या सामूहिक आत्मसमर्पणानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर संपुष्टात येणार आहे.