जेएनएन, नागपूर. 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...' या विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' करीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विद्यापीठाने आदरांजली अर्पण केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर विश्वविक्रमी कार्यक्रम शनिवार, दि. 11 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी पार पडला. यावेळी विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण चार विश्वविक्रमाची ऐतिहासिक नोंद केली.
या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आजही समर्पक असून त्यांच्या मानवता धर्माचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, सुप्रसिद्ध हास्य अभिनेता श्री भारत गणेशपुरे, सन्मान अतिथी म्हणून राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाच्या आवाहनाला विद्यार्थ्यांची विक्रमी साद
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवाहनाला विक्रमी साद दिली. एकूण 52 हजारांपेक्षा अधिक नोंदणी झाली होती. यामध्ये 15 हजार पेक्षा अधिक प्रत्यक्ष उपस्थिती तर १५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभाग नोंदवीत विश्वविक्रमाला गवसणी घातली. एकच गाणे गाणाऱ्या लोकांचा सर्वात मोघेतलानलाइन व्हिडिओ अल्बम (largest online video album of people singing the same song) या प्रकारात विद्यापीठाने 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' नोंदविला. या प्रकारामध्ये यापूर्वी 5 हजार लोकांच्या एकत्रित गीत गायनाचा असलेला वर्ल्ड रेकॉर्ड विद्यापीठाने आज मोडला. एवढेच नव्हे तर तब्बल 15,402 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन यांनी यावेळी विद्यापीठाने केलेल्या 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'ची घोषणा केली. त्याचप्रमाणे यावेळी माननीय कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्यासह आयोजन समितीला वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.
सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह आणखी 3 विश्व विक्रमाची नोंद केली. विद्यापीठ गीत गाण्यात एकाच वेळी सर्वात मोठा सहभाग (largest simultaneous participation in singing a University anthem) या प्रकारात 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' देखील विद्यापीठाने केला. या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र डॉ. मनोज तत्ववादी यांनी माननीय कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्यासह आयोजन समितीला प्रदान केले. या सोबतच जास्तीत जास्त सहभागींनी विद्यापीठाचे गाणे गायले (Maximum Participant's Singing University Song) या प्रकारात विद्यापीठाने 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया' या विक्रमाची देखील नोंद केली आहे.
राष्ट्रसंतांचा मानवता धर्माचे अनुकरण करा - नितीन गडकरी
जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक समर्पक ठरत असल्याचे प्रतिपादन माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विद्यापीठाने स्वीकारलेल्या गीतातून राष्ट्रसंतांनी मानवतेचा सुंदर भाव दिला आहे. मानवतेच्या धर्म पेक्षा कोणताही धर्म, जात, पंथ मोठा नाही. मानवता धर्माचे अनुकरण करू हीच राष्ट्रसंतांना खरी आदरांजली होईल, असे गडकरी म्हणाले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याने विद्यापीठाचे त्यांनी अभिनंदन केले.
ग्रामगीतेतून जीवनदर्शन - भारत गणेशपुरे
सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ग्रामगीतेतील 'बायका मुलांची चिंता लागली म्हणून वैराग्य घेतले... आदी ओवींच्या माध्यमातून आपले जीवन कसे असावे याबाबत आपल्या विनोदी शैलीतून मार्गदर्शन केले. संसाराला त्रासलेला व्यक्ती वैराग्य घेत पुन्हा संसाराच्या आचरणाकडे कसा वळला, याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सुंदर वर्णन केले आहे. महाराजांनी या वर्णनातून आपले जीवन कसे असावे याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश केला असल्याचे गणेशपुरे म्हणाले. या सोबतच काहीही करा- पण मनापासून करा, असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.