जेएनएन, रायगड: राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना चिपळूण आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत अत्यंत चुरशीचे आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे निकाल समोर आले आहेत. कुठे अवघ्या एका मताने विजय मिळाला, तर कुठे सत्ताधारी गटाला अनपेक्षित धक्का बसला आहे.
चिपळूण नगरपरिषदेत एका मताने थरारक विजय
चिपळूण नगरपरिषदेत एका प्रभागात अक्षरशः श्वास रोखून धरणारा निकाल लागला. या प्रभागात शुभम पिसे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत राजकीय इतिहासात नोंदवले आहे. या निकालामुळे चिपळूणमध्ये मोठी चर्चा रंगली असून, मतमोजणीदरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण होते.
चिपळूण नगरपरिषदेत एकूण 26 प्रभाग असून, नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवक पदासाठी तब्बल 110 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. बहुतांश प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, ज्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत उत्सुकता कायम होती.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपचा झेंडा
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपच्या संतोष दाभाडे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे त्या या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होते. मात्र, भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी बाजी मारली.
आपल्या विजयानंतर बोलताना संतोष दाभाडे यांनी या यशाचे श्रेय आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि संघटनात्मक ताकदीमुळे हा विजय शक्य झाल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
मंत्री जयकुमार रावळ यांना निवडणुकीत धक्का
या निवडणुकीत एक मोठा राजकीय धक्का देखील बसला. भाजपच्या रंजनी वानखेडे यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून झाला. विशेष म्हणजे रंजनी वानखेडे यांना मंत्री जयकुमार रावळ यांचा पाठिंबा होता. त्यामुळे हा पराभव भाजपसाठी आणि मंत्री रावळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय समीकरणांवर परिणाम
या दोन्ही नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. चिपळूणमधील अत्यंत अटीतटीच्या लढतीने लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, तर तळेगाव दाभाडेमधील निकालाने आघाडी-युतींच्या राजकारणावर नवे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे
