जेएनएन, मुंबई. कणकवलीत भाजपचे मंत्री नितेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. इथं भाजप उमेदवाराचा पराभव करत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी झाले आहेत.

कणकवलीत नगराध्यक्षपद गमावलं

कणकवलीमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. या ठिकाणी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे विजयी झाले आहेत. कणकवलीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्रं होतं. एकप्रकारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची देखील स्थानिक पातळीवर युती पाहायला मिळाली होती. संदेश पारकर यांची जरी नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेली असली, तरी कणकवलीत 15 पैकी आठ जागी भाजपचे उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत. 

"आमच्या शहर विकास आघाडीत सर्व पक्षाचे नेते होते. आमदार निलेश राणे, उदय सामंत, वैभव नाईक, सतीश सावंत, राजन तेली यांच्यासह सगळ्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे." असं संदेश पारकर यांनी म्हटलं आहे.

मालवण मध्ये शिवसेनेचा विजय

    मालवण नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या ममता वराडकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजप उमेदवाराचा त्यांनी जवळपास 1019 मतांनी पराभव केला आहे. 

    मालवण नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह 20 पैकी 10 नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे मालवण नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अर्थात राणे बंधूंमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता.