जेएनएन, मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होताच आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महानगरपालिका निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून, गावागावात प्रचाराची धामधूम सुरू होणार आहे.
याच आठवड्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता
राज्य निवडणूक आयोगकडून सुरू असलेल्या तयारीनुसार , जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आयोगाकडून मतदार यादी, प्रभागरचना, आरक्षण आणि निवडणूक कार्यक्रमाबाबत अंतिम तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहे. महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा बसताच लगेचच ग्रामीण निवडणुकांची रणनिती आखण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान?
माहितीनुसार, या निवडणुकांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने प्राथमिक वेळापत्रक तयार केले असून, टप्प्याटप्प्याने मतदान घेण्याचा विचार असल्याचेही बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे.
ग्रामीण राजकारणाला वेग, पक्षांची रणनीती आखणी सुरू
महानगरपालिका निवडणुकांमधील निकालांचा थेट परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होण्याची शक्यता असल्याने सर्वच प्रमुख पक्ष या निवडणुकांकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच मनसे आणि इतर प्रादेशिक पक्षांनी ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा -
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागातील सत्तेची केंद्रं मानली जात असल्याने या निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवार निवड, स्थानिक आघाड्या, युती-आघाड्यांचे गणित आणि बंडखोरी रोखण्यासाठी पक्षनेतृत्वाची धावपळ सुरू झाली आहे.
प्रशासकीय तयारीला वेग
दरम्यान, संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन यावर काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
