अकोला (एजन्सी) - Akola Crime : अकोला जिल्ह्यातील एका मशिदीबाहेर चाकूने वार केलेले महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल यांचे बुधवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायतुल्ला पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली होती.
मंगळवारी दुपारी 1.30 वाजता जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहाळा गावात एका मशिदीत नमाज अदा केल्यानंतर पूर्व वैमनस्यातून आरोपीने पटेल (66) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना मान आणि छातीला दुखापत झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
त्यांना तातडीने अकोट येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मशिदीतून बाहेर पडताना रक्ताने माखलेले पटेल यांचे काही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत.
मंगळवारी दुपारी नमाजासाठी पटेल मोहाला येथील जामा मशिदीत होते. दुपारी 1.30 च्या सुमारास, नमाज अदा केल्यानंतर ते मशिदीतून बाहेर पडत असतानाच हल्लेखोराने त्याच्या मानेवर धारदार शस्त्रांनी वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांनी त्यांना तत्काळा रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले.
उबेद खान कालू खान उर्फ रजिक खान पटेल (22) असे आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यासाठी सहा पोलिस पथके तयार करण्यात आली होती. त्याला मंगळवारी रात्री 8 वाजता अकोट तालुक्यातील पणज गावातून अटक करण्यात आली, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले. या घटनेनंतर मोहाळा आणि अकोट शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
