जेएनएन, मुंबई. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या "स्पेशल फोर्स"ने मोठी (Akshaya Tritiya 2026) कारवाई करत तब्बल 32 बालविवाह रोखण्यात यश मिळवले, अशी माहिती : महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात 32 बालविवाह रोखले
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागांत अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा अद्यापही आढळून येते. या अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी, महाराष्ट्रात बालविवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली. "बालविवाह मुक्त भारत" या 100 दिवसांच्या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागाने व्यापक जनजागृती, समन्वय व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे. याच सजगतेचा परिणाम म्हणून अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर 32 बालविवाह रोखण्यात विभागाला यश आले, असं त्यांनी म्हटलं आहे.
कोणत्या विभागात किती बालविवाह रोखले
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी महिला व बालविकास विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच धर्तीवर स्पेशल फोर्सच्या माध्यमातून कोकण विभागात 3, पुणे विभागात 1, नाशिक विभागात 7, छत्रपती संभाजीनगर विभागात 12, अमरावती विभागात 7, नागपूर विभागात 2 असे महाराष्ट्रात एकूण 32 बालविवाह रोखण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्राला बालविवाह मुक्त राज्य बनवण्यासाठी महिला व बाल विकास विभाग अत्यंत समर्पित भावनेने कार्यरत आहे. बालविवाहांना आळा घालण्यासाठी अतिशय कडक कारवाई करत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य ठरत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या अभिमानास्पद वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्रातील नागरिकांचे आभार तटकरे यांनी मानले आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार 18 वर्षांखालील मुलगी व 21 वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे दंडनीय गुन्हा आहे. आपल्या परिसरात बालविवाहाची घटना आपली निदर्शनास येताच "1098" या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयास संपर्क साधावा, अशी विनंती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
