जेएनएन, मुंबई. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात अलीकडेच झालेल्या भीषण ढगफुटीच्या घटनेने प्रचंड हाहाकार माजवला आहे. यामुळे गावात पूर व चिखलाच्या लोंढ्यांनी थैमान घातले असून संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण बेपत्ता असून, महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या अडकलेले आहेत.
उत्तरकाशीतील धराली आणि हर्षिल परिसरात जोरदार ढगफुटी झाली. यामुळे गंगा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला. रस्ते, पूल आणि घरं वाहून गेली. गावाच्या जवळपास संपूर्ण वस्तीच चिखलाखाली गेली आहे. यामुळे अनेक स्थानिक नागरिक आणि पर्यटक बेपत्ता आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटक अडकले?
महाराष्ट्रातील सुमारे 151 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या भागातील नागरिकांचा समावेश आहे. 30 पेक्षा अधिक पर्यटकांचे संपर्क तुटले असल्याने नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे.
संपर्क साधण्यात अडथळे?
या नैसर्गिक आपत्तीनंतर मोबाइल नेटवर्क पूर्णतः कोलमडले असून वीज आणि इंटरनेट सेवाही टप्प आहे. रस्ते खचलेले व बंद असल्यामुळे बचाव पथक पोहोचण्यात अडथळे येत आहेत. स्थानिक प्रशासन, NDRF, SDRF आणि लष्कराच्या मदतीने बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे. यामुळे उत्तराखंड सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफच्या पथकांना तातडीने रवाना करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने देखील आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील क्रमांक दिला आहे.राज्य सरकारने हेल्पलाइन 1070 / 022-22027990
सुरू केली असून disasterhelpline@maharashtra.gov.in या संकेतवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.