मुंबई. Mumbai Weather Update : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली असून राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 19 ऑक्टोबर 2025 च्या सुमारास केरळ-कर्नाटक किनाऱ्याजवळ आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबईत दिसणार असून ढगाळ हवामान आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, अकोला, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना धडकी -
आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कपाशी, सोयाबीन, तूर, मका यांसारख्या पिकांची कापणी सुरू असतानाच पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. पिकं कापणीच्या टप्प्यात आहेत. आणखी एक-दोन दिवस पाऊस झाला तर उत्पादन वाया जाण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा यलो अलर्ट-
पुढील दोन दिवस विजांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत जाऊ शकतो.शेतकरी आणि नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, शेतात विजांच्या वेळी थांबू नये, पिकांची कापणी आणि साठवण काळजीपूर्वक करावी अशी सूचना देण्यात आली आहे.