जेएनएन, मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (MSRDC) टोलनाक्यावर नवा नियम लागू केला आहे. आता एमएसआरडीसीच्या अखत्यारित येणाऱ्या टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. त्यांच्याकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून होणार आहे. त्यानुसार टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत.
1 एप्रिलपासून हायब्रीड मार्गिका बंद
MSRDC मार्फत टोल नाक्यांवर फास्टॅगच्या जोडीला हायब्रीड पद्धतीनेही टोल वसुली केली जात असल्याने दोन मार्गिका हायब्रीड पद्धतीच्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्युआर कोड, आदींद्वारे टोल स्वीकारला जात होता.
मात्र, आज, 1 एप्रिलपासून या हायब्रीड मार्गिका बंद करुन सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे MSRDC मार्फत टोल वसुली होणाऱ्या 9 रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टॅगमार्फतच टोल वसूल केला जाणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसानं पिकाचे मोठं नुकसान, पुन्हा गारपिटीचा अलर्ट
या टोल नाक्यांवर असेल फास्टॅग बंधनकारक
- समृद्धी महामार्गावरील 23 टोल नाके
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई पुणे जुना मार्ग
- मुंबई प्रवेशाद्वारावरील 5 टोल नाके
- वांद्रे वरळी सागरी सेतू
- नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 5 टोल नाके
- सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 4 टोल नाके
- छत्रपती संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 3 नाके
- काटोल बायपास
- चिमूर वरोरा वणी
हेही वाचा - BMC Garbage Tax: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, कचऱ्यासाठी प्रत्येक घराला दरमहा मोजावे लागणार 100 रुपये
वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार
नव्या निर्णयामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन MSRDC च्या अधिकाऱ्यांनी केले आहे.