ठाणे l Mahayuti Seat sharing: ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अखेर शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार बैठका आणि चर्चांनंतर रात्री उशिरा दोन्ही पक्षांमध्ये अंतिम एकमत झाले. ठाणे मनपासाठी महायुतीत शिवसेना 87 तर भाजप 40 जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
ठाण्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये रात्री झालेल्या निर्णायक बैठकीत अखेर तोडगा निघाला. यामध्ये दोन्ही पक्षांनी आपापली ताकद, मागील निवडणुकांचे निकाल, प्रभागनिहाय समीकरणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मते लक्षात घेत जागावाटप निश्चित केल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून महायुतीत तणावाची चर्चा होती. काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत होता. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर आणि सलग बैठकीनंतर अखेर एकत्र लढण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे ठाणे मनपा निवडणुकीत महायुती एकसंघपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाण्याची शक्यता असून प्रचारालाही वेग येणार आहे. दुसरीकडे, विरोधकांकडूनही या जागावाटपावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेवर सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना–भाजप महायुतीने रणनीती आखली असून, जागावाटप फायनल झाल्याने आता निवडणूक प्रचारावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
