जेएनएन, ठाणे. TET Paper Leak Case: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पेपरफुटीच्या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
माहितीनुसार, भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. संशयित व्यक्ती कोनगाव परिसरातील डायमंड हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे विशेष पथक तेथे दाखल झाले. मात्र, संशयित न आढळल्याने पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना घेतले ताब्यात
दरम्यान पोलिसांनी मुंबईतील सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांच्या ताब्यातून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित प्रश्न आणि महत्त्वाचे दस्तऐवज आढळल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तिन्ही संशयितांना भिवंडीत आणण्यात आले असून, कोनगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, देशभरात काही दिवसांपूर्वी झालेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आता टीईटी पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा स्पर्धा व पात्रता परीक्षांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मोठे रॅकेट कार्यरत
या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत असून, लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परीक्षा रद्द झाल्याने हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. नव्या परीक्षेच्या तारखेबाबत संबंधित प्राधिकरणाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
