जेएनएन, पुणे. Maharashtra TET exam cancelled: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत उद्या म्हणजेच 28 जून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी जाहीर केले आहे. भिवंडीत एका इसमाकडे काही प्रश्न समान मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेबद्दल माहिती दिली आहे. आयोगानुसार, शिक्षक पात्रता (TET 2026) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलं….
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि. 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या.
तथापि, आज दि.27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता दि.28 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
