जेएनएन, मुंबई. TET exam cancelled: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि. 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते,  मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. टीईटी परीक्षा रद्द आणि पेपर फुटीच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमित देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

‘देशात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे युवांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. त्यात आज आणखी एक भर पडली आहे. राज्यात उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता #TET परीक्षेचा पेपर आज फुटला आहे.  "आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिली आहे का?"

लगे रहो ट्रिपल इंजिन सरकार, पेपरफुटीत महाराष्ट्र आता नाही थांबणार..!’ असे ट्वीट करून त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

TET पेपरही फुटला... महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम! - विजय वड्डेटीवार

‘TET पेपरही फुटला... महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम! 

    महाराष्ट्राची ओळख ही शिक्षण, आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे होती. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीची झाली आहे, ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. आता ठाण्यात TETचा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने कष्ट करून, रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली. पण काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्या सर्व मेहनतीवर एका क्षणात पाणी फेरले गेले.

    ही केवळ पेपरफुटी नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या भविष्याची चोरी आहे. सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यातच व्यस्त असते. दरवेळी दोषींवर कारवाई करू असे सांगितले जाते, पण पुढचा पेपर पुन्हा फुटतो. याचा अर्थ दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नाही किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत आहे.’ अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

    ‘पेपरफुटी हा आता अपवाद राहिलेला नाही, तर या दलिंदर सरकारची ओळख बनली आहे! 

    उद्या महाराष्ट्रात होणारा TET परीक्षेचा पेपर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं आहे? एकीकडे "पारदर्शक कारभार"च्या घोषणा, तर दुसरीकडे पेपरफुटीचं अखंड सत्र! विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कोणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची? 

    या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरणार आहे.’ असे ट्वीट करून सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.

    हेही वाचा - Maharashtra TET Exam Cancel: मोठी बातमी! शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रद्द, भिवंडीत पेपर लिक