मुंबई. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत असून, बंडखोर उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. माहितीनुसार, मुंबईत शिवसेनेचे तब्बल 35 पदाधिकारी उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

जागावाटप आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जात असून, त्याचा थेट फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर बंडखोरी आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

या नाराज अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मैदानात उतरत थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मंत्री उदय सामंत, खासदार रविंद्र वायकर, खासदार राहुल शेवाळे, शितल म्हात्रे आणि मिलिंद देवरा हे नेते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधत असल्याची माहिती आहे.

या चर्चांमध्ये बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली जात असून, पक्षसंघटनेत भविष्यात योग्य संधी देण्याचं आश्वासनही दिलं जात आहे.

दरम्यान, उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, तोपर्यंत बंडखोर उमेदवारांची नाराजी कितपत दूर होते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेत्यांना या समजुतीच्या प्रयत्नात कितपत यश मिळतं, यावरच मुंबई महापालिका निवडणुकीतील पक्षाचं चित्र अवलंबून असणार आहे.