जेएनएन, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली असली, तरी काही प्रभागांमध्ये उमेदवारीवरून बंडखोरीचे सूर उमटताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी असल्याने, युतीला पहिल्याच टप्प्यात आव्हान उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर बंडखोरी रोखण्यासाठी आणि नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काही प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी तीव्र असल्याने, केवळ फोन किंवा बैठकीपुरते मर्यादित न राहता, थेट भेटीगाठी घेऊन तोडगा काढण्यावर नेतृत्वाचा भर आहे.
माहितीनुसार, ज्या प्रभागांमध्ये बंडखोरीची शक्यता अधिक आहे, तिथे दोन्ही पक्षांचे निरीक्षक नेमण्यात आले आहेत. नाराज इच्छुकांना भविष्यातील संधी, संघटनात्मक पदे किंवा स्थानिक पातळीवरील जबाबदाऱ्या देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, युतीचा व्यापक फायदा आणि मराठी मतांचे एकत्रीकरण यावर भर देत कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यास काही प्रभागांमध्ये मतांची विभागणी होण्याची भीती युतीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती केवळ कागदावर न राहता, तळागाळात यशस्वी ठरावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून विशेष लक्ष दिले जात आहे.
एकीकडे भाजप आणि महायुतीकडून आक्रमक तयारी सुरू असताना, ठाकरे बंधूंच्या युतीसमोर अंतर्गत बंडखोरी हे मोठे आव्हान ठरत आहे. येत्या काही दिवसांत वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोरी आटोक्यात येते की नाही, यावरच युतीच्या निवडणुकीतील यशापयशाचे गणित अवलंबून असणार आहे.
हेही वाचा: BMC Election 2026: मुंबई मनपा रणधुमाळीत मराठी–अमराठीचा मुद्दा पुन्हा गाजणार; ठाकरे भाजप आमने सामने
हेही वाचा: मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर; बंडखोरी शमवण्यासाठी स्वतः मैदानात
