जेएनएन, मुंबई. राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 ते 48 तासांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भाग, नदीकाठची गावे आणि घाट रस्त्यांवर प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची, नद्या-नाले दुथडी भरून वाहण्याची तसेच दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना मिळाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घाट रस्त्यांवर प्रवास टाळा
मुंबई-गोवा महामार्गासह विविध घाट रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे दृष्यमानता कमी होण्याची तसेच दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घाट रस्त्यांवरील प्रवास टाळावा. वाहनचालकांनी वेग मर्यादेत वाहन चालवावे आणि हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा - Maharashtra Rain Update: राज्यभरात मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी
प्रशासन सज्ज
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका, अग्निशमन दल, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
