जेएनएन, मुंबई. राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.  तर अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई-एमएमआरमध्ये रेड अलर्ट 

IMD ने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून सखल भागात पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.   

विदर्भातही पावसाचा जोर 

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ,भंडारा आणि गोंदिया परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.   

शाळांना सुट्टी जाहीर 

    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक प्रशासनांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

    कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) हद्दीतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.  

    मुंबईतील काही शाळांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार सुट्टी देण्यात आली असून पालकांनी संबंधित शाळांच्या अधिकृत सूचनांची खात्री करून घ्यावी.   

    हवामान खात्याचा अंदाज 

    • हवामान विभागाच्या अंदाजानुसार:
    • कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि घाटमाथ्यावर पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
    • विदर्भात जोरदार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा.
    • मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही जोरदार सरी कायम राहणार.  

    नागरिकांसाठी सूचना 

    • अनावश्यक प्रवास टाळावा.
    • सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे.
    • नदी-नाले आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे.
    •  हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

    हेही वाचा - Monsoon Session: 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकचा मुद्दा विधानसभेत गाजला: शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीबंदी, तुकाराम मुंढेंची विधानसभेत एंट्री