जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Update: मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शनिवारीही कायम आहे. रात्रभर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज आणि उद्यासाठी अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. पुढील 48 तास नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सलग पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले असून काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्त्यांवर जलसाच्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल रेल्वे आणि बससेवांवरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.  

24 तासांत 100 मिमीहून अधिक पाऊस

मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे सखल भाग जलमय झाले असून नाले आणि लहान ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. हवामान विभागाच्या मते, सक्रिय मान्सून प्रणालीमुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.  

रेड अलर्ट; प्रशासन हाय अलर्टवर

    IMD ने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात आले आहेत.  

    मुंबईसाठी हेल्पलाईन 1916 

    आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने 1916 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय स्थानिक महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाशीही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    • पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
    • ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827
    • ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
    • पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42

    गरिकांसाठी प्रशासनाच्या सूचना

    • अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
    • सखल भाग, नदी-नाले आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे.
    • घाट रस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी.
    • हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
    • आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नियंत्रण कक्ष किंवा महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

    पुढील दोन दिवस महत्त्वाचे

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (4 जुलै) आणि उद्या (5 जुलै) मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.