जेएनएन, पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील (पुणे ग्रामीण) यवत गावात (Tension flared in Yavat) आज सकाळपासूनच तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. दोन गटांमध्ये अचानक मोठा वाद पेटल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दोन गट आमनेसामने, दगडफेक

दौंड तालुक्यातील (पुणे ग्रामीण) यवत गावात एका आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेत आरोपीच्या घरावर दगडफेक, टायर जाळणे आणि तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी उपस्थित आहेत, अशी माहिती यवत पोलीसांनी दिली आहे. 

तगडा बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील काही भागात तणाव कमी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासन सतत प्रयत्न करत आहेत. 

शांतता राखण्याचे आवाहन 

    प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट शेअर केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 

    नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

    या घटनेमुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, अनेकांनी स्वतःची दुकानं बंद ठेवली आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.