सातारा. Satara lady doctor suicide Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. दरम्यान संबंधित दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेतील संपूर्ण तपास जलदगतीने आणि पारदर्शकपणे करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, दोषींना कोणतीही सूट देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे. घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि महिला डॉक्टर समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे.
सदर महिला डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ व दबाव आल्याच्या आरोपानंतर त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर डॉक्टर संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश दिले. तपासात दुर्लक्ष करणारे अधिकारी निलंबित करण्याबरोबरच तपासाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारने या घटनेचा न्यायिक तपास करून दोषींना कठोर शिक्षा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
