जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack Update: पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. तर अनेक पर्यटक हे  काश्मीरच्या विविध भागात अडकले आहेत. यातच आता या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या राज्यातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.

राज्यातील या पर्यटकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.