मुंबई.Western Railway local trains: पश्चिम रेल्वेने नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू केलं आहे. या बदलाचा थेट परिणाम पालघर–डहाणू मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर होणार आहे. उपनगरीय लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत किरकोळ पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, डहाणू, बोईसर, वांद्रे, विरार या मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाऊन दिशेच्या प्रत्येकी 36 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काही गाड्यांची सुटण्याची वेळ 2 ते 5 मिनिटांनी पुढे-मागे करण्यात आली असून, काही गाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यातही सुधारणा करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी बदल!
रेल्वे प्रशासनानं हे बदल प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि वेळेत करण्याच्या उद्देशानं केले असल्याचं स्पष्ट केलं आहे. गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांचं नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाचं आवाहन!
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, नवीन वेळापत्रकाची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर, मोबाइल अॅप किंवा स्थानकांवरील सूचना फलकावर तपासावी. जुन्या वेळापत्रकावर अवलंबून राहू नये, अन्यथा गाडी चुकण्याची शक्यता आहे.
नवीन वेळापत्रकामुळे पालघर–डहाणू पट्ट्यातील नियमित प्रवाशांना सुरुवातीला थोडा बदल जाणवेल, मात्र पुढील काळात वेळेचं चांगलं व्यवस्थापन आणि प्रवासातील शिस्त याचा फायदा होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे.
