जेएनएन, मुंबई. Mumbai Local Train : मुंबईसह उपनगरी रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रोज तिकीट काढण्यापेक्षा नियमित प्रवास करणारे प्रवासी मासिक किंवा त्रैमासिक पास काढण्याला प्राधान्य देतात. डिजिटलायझेशननंतर तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी बहुतांश प्रवाशांनी UTS (Unreserved Ticketing System) अ‍ॅपचा पर्याय स्वीकारला होता. मात्र आता भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे.

भारतीय रेल्वेने UTS अ‍ॅपवरील मासिक पास बुकिंगची सुविधा बंद केली असून, पास काढण्यासाठी प्रवाशांना नवीन ‘RailOne’ अ‍ॅप वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासननुसार, सर्व प्रवासी सेवा एका एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या उद्देशाने RailOne अ‍ॅप सुरू करण्यात आलं आहे. तिकीट, पास, प्रवासाशी संबंधित माहिती, तक्रार नोंदणी अशा अनेक सुविधा एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात UTSसारख्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सवरील काही सुविधा टप्प्याटप्प्याने RailOne अ‍ॅपवर स्थलांतरित केल्या जात आहेत.

UTS अ‍ॅपवरून मासिक पास काढण्याची सुविधा बंद झाल्याने, आता नवीन पास काढायचा असल्यास प्रवाशांना RailOne अ‍ॅप डाउनलोड करून त्यावर नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, आधीच काढलेले वैध पास मुदत संपेपर्यंत वापरता येणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, अनेक प्रवाशांनी या बदलाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रवाशांना एकाच अ‍ॅपवर सर्व सुविधा मिळणार असल्याने हा बदल सोयीचा वाटत आहे, तर काही प्रवाशांनी नव्या अ‍ॅपची सवय होण्यासाठी वेळ लागेल, अशी भावना व्यक्त केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रोजच्या प्रवाशांसाठी योग्य मार्गदर्शन आणि माहिती देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.