जेएनएन, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी राज्यभर महाराष्ट्र भाजपकडून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभरात सेवा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यात भव्य ड्रोन शो आयोजित 

मुंबईत भाजप कार्यालयात सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. पुण्यातील एस. पी. कॉलेज मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य ड्रोन शो आयोजित होणार आहे. या ड्रोन शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कामगिरी, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा सादर केला जाणार आहे. याच ठिकाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचा संगीत मैफलीचा कार्यक्रम होणार आहे.

सेवा सप्ताह जाहीर

दरम्यान, भाजपने ‘सेवा सप्ताह’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर जाहीर केला आहे. या कालावधीत रक्तदान शिबीरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता अभियान आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. राज्यातील भाजपचे कार्यकर्ते जिल्हा व तालुका पातळीवर कार्यक्रम घेऊन मोदींच्या वाढदिवसाला ‘सेवेचा उत्सव’ म्हणून साजरा करणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा जागर होणार

    भाजपकडून या उपक्रमांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा जागर निर्माण करणे, तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचवणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.