मुंबई. Maharashtra Municipal Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये अंतर्गत बंडखोरी कायम असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी, बंडखोर उमेदवार आणि दबावाचं राजकारण उघडपणे पाहायला मिळत आहे.
तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष किंवा बंडखोर म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने पक्षनेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. ही बंडखोरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना नुकसान पोहोचवू नये, यासाठी बड्या नेत्यांनी स्वतः मैदानात उतरून बंडखोरांची मनधरणी केली. काही ठिकाणी पदांचं आश्वासन, भविष्यातील संधी, तर काही ठिकाणी उघड-अप्रत्यक्ष दबाव आणि राजकीय समजूतदारपणाचा वापर करण्यात आला.
अर्ज माघारीसाठी अनेक प्रभागांमध्ये प्रलोभनांचीही चर्चा रंगली, तर काही ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत बैठकांवर बैठका सुरू होत्या. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही अनेक बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने काही प्रभागांत तिरंगी आणि चौफेर लढती अटळ ठरल्या आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी प्रमुख पक्षांनी अनपेक्षित उमेदवार मैदानात उतरवत विरोधकांना धक्का दिला आहे. रणनीतीपूर्वक केलेल्या या हालचालींमुळे काही प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतदानाच्या रणांगणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाने दिलेले अधिकृत उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतंत्र रणनिती आखली जात असून, बंडखोरीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढील काही दिवस नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता अर्ज माघारीनंतरचं अंतिम चित्र स्पष्ट झाल्याने, निवडणूक प्रचाराला आणखी वेग येणार असून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
