नवी मुंबई. Panvel Municipal Election : पनवेल महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला (मविआ) मोठा धक्का बसला आहे. तब्बल 7 उमेदवारांनी माघार घेतली आहे. या राजकीय घडामोडींमुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रभागात शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने नितीन पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. परिणामी, कोणतीही थेट लढत न होता पाटील यांची अधिकृतपणे बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
दरम्यान, पनवेलमधील विविध प्रभागांतून मविआचे उमेदवार माघार घेत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंतर्गत नाराजी, उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेले मतभेद आणि भाजपच्या संघटनात्मक ताकदीमुळे विरोधकांना मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.
भाजपकडून मात्र या घडामोडींकडे संघटनात्मक यश म्हणून पाहिलं जात आहे. “पनवेलमधील विकासकामांवर मतदारांनी विश्वास दाखवला आहे. बिनविरोध निवड ही त्या विश्वासाचीच पावती आहे,” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा वरचष्मा अधिक ठळक होत असून मविआसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. येत्या काळात आणखी काही प्रभागांत अशाच प्रकारच्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
