मुंबई - Mumbai Rains : सोमवारी सकाळी मुंबईत संततधार पाऊस आणि पाणी साचल्याने मायानगरीचा वेग मंदावला आहे. आयएमडीने शहर व उपनगरासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, पुढील काही तासांत शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रात्रभर आणि सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर, दादर, कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्थानकांवर रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.

लोकल 10 मिनिटांच्या उशिराने -

मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी  लोकल रेल्वे सेवेवर मुसळधार पावसाने  परिणाम झाला. लोकल सेवा 10 मिनिट उशिरा धावत आहे. मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरील गाड्या साधारण १० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोकल रुळांवर पाणी साचले आहे.त्यामुळे  गाड्यांचा वेग नियंत्रित करण्यात आला आहे. तथापि, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, काल रात्रीपासून सतत पाऊस पडत असूनही, त्यांच्या उपनगरीय सेवा सामान्यपणे सुरू आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळीही सुरूच राहिला, ज्यामुळे किंग्ज सर्कल, लालबाग, वरळी, दादर, परळ, कुर्ला आणि इतर भागात पाणी साचले.

पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती आणखी बिकट झाली. सकाळी 8.30 वाजता जारी केलेल्या इशारामध्ये, हवामान खात्याने पुढील तीन तासांत मुंबई आणि शेजारील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने पाऊस आणि गडगडाटी वादळासह जोरदार ते अतिशय तीव्र सरी येण्याची शक्यता वर्तवली आहे.

रस्ते वाहतुकीवर परिणाम-

    मुंबईतील दादर, सायन, कुर्ला, चेंबूर, परळ या भागात पावसामुळे वाहनचालकांची कोंडी झाली. काही ठिकाणी जलजमावामुळे वाहने हळूहळू  पुढे सरकत आहे.दरम्यान BEST बस मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

    हवामान विभागाचा खात्याचा इशारा -

    हवामान विभागाने  मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सोमवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे आयएमडी मुंबईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

    पुढील 24 तासांत, आयएमडीने शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ढगाळ आकाशासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस" पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

    गेल्या 24 तासांत, दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 134.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत 73.2 मिमी पावसाची नोंद झाली.

    महापालिकेच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या २४ तासांच्या कालावधीत बेट शहरात सरासरी 111.19 मिमी पाऊस पडला, त्यानंतर पूर्व उपनगरात 76.46 मिमी आणि पश्चिम उपनगरात 74.15 मिमी पाऊस पडला.

    आयएमडीने पालघर, पुणे, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे, ज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची किंवा हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.