मुंबई -  Mumbai Mono Train : मुंबईत रविवारपासून जोरदार पाऊस पडत आहे.या पावसाचा परिणाम शहराच्या वाहतुकीवर होत असतानाच वडाळा परिसरात मोनोरेल सेवेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे काही काळ प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा मोनोरेल ट्रेन अचानक रुळांवरच थांबली, त्यानंतर त्यातील 17 प्रवाशांना वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना वडाळा येथील अँटॉप हिल बस डेपो आणि जीटीबीएन मोनोरेल स्टेशन दरम्यान घडली.

मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक बिघाडामुळे सकाळी 7.16 वाजता ही घटना घडली. 

सुमारे 45 मिनिटांनंतर अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि त्यांना दुसऱ्या मोनोरेल ट्रेनमध्ये हलवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. मोनोरेलच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) शी याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

गेल्या महिन्यात, मुसळधार पावसात, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दोन मोनोरेल गाड्या अडकल्या होत्या त्यातील, शेकडो प्रवाशांना सुरक्षित वाचवले होते. 

प्रवाशांना पावसातच खाली उतरवले -

मोनोरेल थांबल्याने प्रवासी काही काळ गाडीतच अडकले. अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेची खबरदारी घेत प्रवाशांना बाहेर काढले.अचानक सेवा विस्कळीत झाल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी धावपळ झाली. मोनोरेल प्रशासनाने सांगितले की, हा तांत्रिक बिघाड आहे. 

    पावसाचा परिणाम -

    मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे लोकल रेल्वे, रस्ते वाहतूक आणि आता मोनोरेल यावर परिणाम झाला आहे. शहरातील दादर, सायन, वडाळा, चेंबूर अंधेरी भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने  संथ गतीने चालत आहे.