जेएनएन, मुंबई. Mumbai Metro Latest News: गणेशोत्सवात लाखो भाविक मुंबईतील गणपती दर्शनासाठी, देखावे पाहण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक भक्त बाहेर पडतात. या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल्वे विकास प्राधिकरणाने (MMRDA) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई मेट्रोने रात्री 1 वाजेपर्यंत सेवा वाढवली 

मुंबई मेट्रो वनने 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात गणेशोत्सवासाठी रात्री 1 वाजेपर्यंत सेवा वाढवली. त्यानुसार, शेवटची ट्रेन वर्सोवाहून घाटकोपरकडे रात्री 12.15 वाजता आणि घाटकोपरहून वर्सोवाकडे रात्री 12.40 वाजता सुटेल अशी माहिती मुंबई मेट्रो कडून देण्यात आली आहे. 

विस्तारित वेळापत्रक जाहीर

27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान एकूण 11 दिवस हा विस्तारित वेळापत्रक मुंबई मेट्रोने जाहीर केला आहे. यामध्ये आधीची मेट्रो सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असायची मात्र आता तीच सेवा नव्या वेळापत्रक अनुसार रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

वेळ वाढविण्याचे कारण!  

    गणपती दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो मुंबईकर रात्री उशिरापर्यंत प्रवास करतात. त्यामुळे भाविकांना परतीच्या प्रवासात त्रास होऊ नये यासाठी मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे. 

    विसर्जनाच्या काळात विशेषतः रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असल्याने प्रवाशांना मेट्रो एक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.या सोयीमुळे प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. उपनगरांमध्ये राहणाऱ्यांना रात्री उशिरा परतण्यासाठी मेट्रो सेवा सोयीस्कर पर्याय उपलब्ध असणार आहे.