मुंबई - BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चांना वेग असतानाच, भाजपकडून संघटनात्मक पातळीवर तयारी अधिक तीव्र करण्यात आली आहे. याच अनुषंगाने आज मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाही भाजपने निवडणूक तयारीला पूर्ण गती दिली आहे. निवडणुकीची व्यूहरचना, प्रचाराचे नियोजन आणि पुढील टप्प्यातील महत्त्वाच्या बाबींवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा-

या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची एकूण रणनीती ठरवली जाणार आहे. प्रचाराची दिशा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची यंत्रणा, बूथस्तरावरील व्यवस्थापन, सोशल मीडिया प्रचार तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचाराची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. यासोबतच, विविध विभाग, प्रभाग आणि विधानसभा स्तरावर जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार असून, कोणत्या नेत्याकडे कोणता भाग सोपवायचा, यावरही अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती-

या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मुंबईसाठीचे निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार, तसेच मुंबईतील भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि निवडणूक संचालन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत निर्णयांना विशेष महत्त्व दिले जात आहे.जागावाटपाच्या चर्चांदरम्यान भाजपची आक्रमक तयारी सुरुवात झाली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नसतानाही भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला आहे. संभाव्य सर्व पर्याय लक्षात घेऊन भाजप पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे या बैठकांवरून स्पष्ट होत आहे.

    मुंबई निवडणुकीत भाजपचा फोकस!

    मुंबई महापालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असून, 2017 नंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी पक्षाकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय आगामी प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.