मुंबई. Ladki Bahin Yojana News : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून (4 नोव्हेंबर) पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “ऑक्टोबर महिन्याचा ₹1500 चा हप्ता आजपासून पात्र बहिणींना मिळणार आहे.” गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता 4 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स'वर दिली आहे.

सोशल मीडिया पोस्टमध्ये आदिती तटकरे यांनी काय म्हटलं आहे?

आदिती तटकरे यांनी 'एक्स'वर  पोस्ट करत ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!' असं म्हटलं आहे. पुढे म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.

महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !

    काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’?

    ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे.

    या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते.

    महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे.

    राज्यभरातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

    केवायसी पूर्ण करणे अनिवार्य!

    मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ज्यांनी अद्याप आपली केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने करून घ्यावी, अन्यथा हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो.

    केवायसी करताना महिलांनी बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक एकमेकांशी लिंक केलेले असल्याची खात्री करावी.

    ग्रामपंचायत कार्यालय, महिला बालविकास प्रकल्प कार्यालय किंवा जवळच्या सेवा केंद्रांमधून केवायसी प्रक्रिया करता येते.