जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली असून, भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल तोपर्यंत) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.

अभय वाघ यांच्यांकडे अतिरिक्त कार्यभार

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1-क) नुसार डॉ. अभय एकनाथ वाघ, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे.  भारताचे संविधानाच्या अनुच्छेद 316 च्या खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे, विवेक लक्ष्मीकांत भीमनवार, भारतीय प्रशासकीय सेवा यांची, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्ती ही, त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.  

भीमनवार हे अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारुन अध्यक्ष पदाची कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात करेपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 च्या खंड (1क) नुसार अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अभय एकनाथ वाघ, सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडे सोपविण्यात येत आहे.