जेएनएन, मुंबई. MPSC Combine Exam: येत्या 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग सज्ज आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्व प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित
दि. 02 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’ (MPSC Combine Exam 2024) या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही, असे डॉ. खरात यांनी सांगितलं.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दि.2 फेब्रु.2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. pic.twitter.com/dBc8T4hl0v
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 30, 2025
हेही वाचा - Maha Kumbh 2025: जुना आखाड्याच्या छावणीला भीषण आग, 15 तंबू खाक;अधिकारी घटनास्थळी दाखल!
कोणत्याही अमिषाला बळी पडू नका
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी, असं त्यांनी आवाहन केलं. तसंच, कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा - पोलिसांची मोठी कारवाई, तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणारा पेडलर जेरबंद; गुंगीच्या औषधांचा साठा जप्त
2 लाख 86 हजार उमेदवार परीक्षा देणार
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी 2 लाख 86 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली, असल्याचेही डॉ खरात यांनी यावेळी सांगितले.